उमरगा (प्रतिनिधी)- आज एक युग संपल्याची हळहळ मनाला चटका लावून जाते आहे. राजकारणातील साठ वर्षांहून अधिक प्रवासात सत्य, संयम आणि सुसंस्कार यांचे मूर्तिमंत रूप जपणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचे आपल्या मधून जाणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबीयांचीच नाही, तर संपूर्ण समाजाची, राज्याची आणि राष्ट्राची मोठी हानी आहे. अशी प्रतिक्रिया विठ्ठल साई साखर कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

आपल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत आदरणीय चाकूरकर साहेबांनी राष्ट्राच्या जडणघडणीत उल्लेखनीय योगदान दिले. केंद्रीय गृहमंत्री असो किंवा लोकसभेचे अध्यक्ष, सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि उल्लेखनीय कार्यक्षमतेने पार पाडल्या. त्यांचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन, संतुलित नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा आगामी पिढ्यांसाठी निश्चयाने प्रेरणादायी ठरेल. आदरणीय चाकूरकर साहेब व आमच्या मुरूमकर पाटील कुटुंबातील संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यांनी मला नेहमीच स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम, मार्गदर्शन आणि मायेची सावली दिली. एक सुसंस्कृत, संयमी आणि मूल्यनिष्ठ राजकारणी म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आदरणीय साहेबांचा मोठा वाटा आहे. आज या अत्यंत दुःखद प्रसंगी, माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण भाजप परिवाराच्या वतीने आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

 
Top