धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृत्ती आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे,सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊन मनुष्य व पाळीव जनावरांची देखील जीवित हानी झाली.या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंद्र सरकारच्या पथकाने ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सरीन यांच्या नेतृत्वात पाहणी केली.या पथकात वित्त मंत्रालयाचे उपसचिव कंदर्प पटेल,ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव अभिषेक कुमार राज आणि जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सतेंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता.
परांडा तालुक्यातील खासगाव येथील व वागेगव्हाण या गावांना भेटी दिल्या. खासगाव येथे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी दत्तात्रय सातपुते आणि प्रदीप शहा यांच्या शेतीची पाहणी केली.उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले.पथकाने उल्फा नदीच्या पुलावरून नदी पात्राची पाहणी केली. वागेगव्हाण येथील नुकसान झालेल्या शेतीची आणि घराची पाहणी केली.तसेच सीना नदीच्या काठावरून पुरबाधित ग्रामस्थांकडून पुर परिस्थितीची माहिती घेतली.
या दोन्ही गावांना पथकाच्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,सहायक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता आडे,तहसीलदार मनिष काकडे,प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत यांची उपस्थिती होती.
