धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला वेग येत असताना आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 मध्ये मोठे राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. भाजपचे युवा नेते विलास बापू लोंढे यांनी शेकडो समर्थकांसह दिमाखात नगर परिषद कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

भाजप कार्यालयापासून नगर परिषदेपर्यंतच्या संपूर्ण मार्गावर मोटारसायकल रॅली, फटाके, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आज प्रभाग 20 मध्ये निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. विलास लोंढे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार म्हणून नगर परिषद कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  नीता अंधारे नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने नागरिक, युवा कार्यकर्ते, महिला आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी प्रभागातील आणि शहरातील महत्त्वाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, धारासुर मर्दिनी देवी मंदिर, हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी (रहे.) दर्गाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच लहुजी वस्ताद साळवे चौक येथे जाऊन त्यांनी आशिर्वाद घेत निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली. विलास लोंढे यांच्या उमेदवारीनंतर प्रभाग 20 मधील राजकीय समीकरणात मोठी रंगत येणार असून, त्यांच्या भव्य शक्ती प्रदर्शनाची आज दिवसभर चर्चाच सुरू होती. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे प्रभाग 20 मधील ही उमेदवारी विशेष ठरली आहे.


 
Top