मुरूम  (प्रतिनिधी)-  येथील रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने अभियंता दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध अभियंत्यांचा सत्कार सोमवारी दि. 15 सप्टेंबर रोजी नगर परिषदेच्या सभागृहात करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी होते. यावेळी नगरपरिषदेच्या नगर रचना सहाय्यक सुमित्रा गिरी, रोटरीचे सचिव कलाप्पा पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगर अभियंता राहुल यादव, पाणीपुरवठा अभियंता पवनकुमार सुतार, प्रशासकीय अधिकारी श्रीराम नाडे, नगर रचना सहाय्यक सुमित्रा गिरी, प्रधानमंत्री आवास योजना अभियंता गौरव वडे, महावितरणचे अभियंता सचिन वाघमारे तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमित्रा गिरी, राहुल यादव, सचिन वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी म्हणाले की, रोटरीही समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करून त्यांनी करत असलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा, बळ देते. ज्यामुळे अशा लोकांच्या हातून भविष्यासाठी समाजोपयोगी कार्य त्यांच्या हातून घडावे. सुशील कांबळे, पाशा जेवळे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. भूषण पाताळे, सुनिल राठोड, शिवकुमार स्वामी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार कलाप्पा पाटील यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने नगरपरिषदेचे कर्मचारी वृंद व नागरिक उपस्थित होते.  

 
Top