धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील 36 जिल्ह्यातील बस स्थानकांचे ॲडिट केले असता महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला दिसून येत आहे. अंधाऱ्या जागा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, सुरक्षा रक्षकांची अपुरी संख्या, तक्रार निवारण केंद्रांचा अभाव तसेच बस उशिरा मिळाल्याने महिलांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याचे शासन यंत्रणेतील घटक व विविध सामाजिक संस्थांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या सुकाणू समितीच्या सदस्य डॉ. स्मिता शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी विविध महिला संघटनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस डॉ. स्मिता शहापूरकर, सुनिता बागल, सुरेखा जगदाळे, रंजिता पवार, वासंती मुळे, श्वेता पगारे, कांता शिंदे ॲड. अजय वाघाळे, गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, राजेंद्र धावारे, अब्दुल रौफ शेख उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातील सहा बस स्थानकांतील महिला सुरक्षाविषयक निष्काळजीपणाचा सर्वेक्षण अहवाल आणि विविध उपाययोजना परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विभागीय नियंत्रकांमार्फत निवेदनाद्वारे दिल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानात आठ हजार महिलांसह आंदोलन करण्याचा इशारा परिषदेच्या सदस्यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेची राज्यस्तरीय परिषद डिसेंबर महिन्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स्वारगेटच्या प्रकारानंतर ऑडिट
पुणे येथील स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात 25 फेब्रुवारी रोजी एका तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेनंतर राज्यातील सर्वच बस स्थानक आणि परिसराच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बस स्थानकांमध्ये महिलांसाठी मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा आणि सुरक्षा याविषयी धाराशिव जिल्ह्यातील काही संस्थांनी बस स्थानकावर सकाळी आणि रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये स्वयंसेवी संस्था आणि प्रतिनिधींना महिलांच्या सुरक्षेविषयी धक्कादायक चित्र दिसून आले.हा सर्व्हे 15 मे ते 30 जून या कालावधीत सकाळी व रात्री करण्यात आला. यावेळी सर्व्हेक्षण करणाऱ्या महीला कार्यकर्त्यांनी आपले अनुभव सांगितले.
सर्व महिला संघटना एकत्र येणार
धाराशिव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील महिला सुरक्षाविषयक सुविधांचा स्त्री-मुक्ती संघटना, अणदूर येथील हॅलो मेडिकल फौंडेशन, नळदुर्ग व अणदूर येथे हॅलो मेडिकल फौंडेशन, सामर्थ्य कल्याणकारी संस्था,जिजाऊ ब्रिगेड, उमेद अभियान, सीआरपी, समता सैनिक दल, संत सेवालाल समृध्दी योजनेच्या प्रतिनिधींनी सर्वे केला आहे.
यातून त्यांना महिला सुरक्षाविषयक विविध समस्या आढळून आल्या. यात बसस्थानकात पूर्णवेळ महिला पोलीस नसणे, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तक्रार निवारणाची व्यवस्था नाही, स्वच्छतागृह महिला -पुरूषांचे एकत्र आहे, स्वतंत्र सोय नाही, हिरकणी कक्ष बंद आहे, बस स्थानका बाहेर रिक्षाचालकांची बेशिस्त आणि महिलांना त्रासदायक वागणूक दिली जाते. या सर्वेमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील महिला संघटना एकत्र येवू काम करणार आहेत अशी माहिती सांगण्यात आली.