धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धाराशिव तालुकास्तरीय कार्यशाळा कै. यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या ६ ऑगस्ट २०२५ च्या निर्णयानुसार ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते संत गाडगेबाबा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाले. प्रांताधिकारी (सा.) तुकाराम भालके, माजी पदाधिकारी संजय काका लोखंडे, प्रशिक्षक महेंद्र पांगळ यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त भांडारवाडी, धारूर, खानापूर आणि बावी कवळार ग्रामपंचायतींच्या सरपंच व अधिकाऱ्यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन झाला. राज्यस्तरीय पुरस्कार विजेते विजयसिंह नलावडे यांचा विशेष सत्कार गटविकास अधिकारी संतोष नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असून सुशासनयुक्त, सक्षम, जलसमृद्ध व स्वच्छ हरितगाव घडविण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. सुशासनयुक्त पंचायत, आर्थिक सक्षमीकरण, जलसंधारण, स्वच्छता, हरित उपक्रम आणि मनरेगा योजनांचे लोकसहभागातून परिणामकारक राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी सर्व ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जास्तीत जास्त गुण मिळवत राज्यस्तरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षक महेंद्र पांगळ यांनी अभियानाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट केली. शेवटी सरपंच प्रतिनिधी वाघोली व माजी सरपंच खेड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागीय अधिकारी भांगे एस.एस. आणि पंचायत समितीतील अधिकारी–कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.