धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याला आधुनिक, डिजिटल आणि प्रगत जिल्हा बनवायचे आहे. यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. म्हणून नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. यासह जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी यांना समृद्ध करण्याचे स्वप्न आपण सर्वजण मिळून साकार करूयात, असा विश्वास व्यक्त करत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पालकमंत्री सरनाईक यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी त्यांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करत मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना मान्यवरांनी आदरांजली वाहिली. या प्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,  जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक गोविंद नलावडे, नागनाथ कुंभार, भास्कर नायगावकर, कलावंतीबाई उमरे, बायडाबाई भिंगरे, यांसह स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विविध विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आदींची  उपस्थिती होती. 

पालकमंत्र्यांच्याहस्ते मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या केलेल्या मयत व्यक्तीचे वारसदार कोमल भोसले, शिवाजी निलंगे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी दहा लाख रूपयांचा, तर नैसर्गिक आपत्ती सहाय्यता निधीमधून फुलुबाई इंगळे यांना चार लाखांचा धनादेश देण्यात आला. कुणबी जात प्रमाणपत्रांचेही प्रातिनिधकि स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सिरेंटिका रिन्यूबल एनर्जी कंपनीच्या सीएसआर अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवांना देखील प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, यांना भेटून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले.  

 

पालकमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशातील काही ठळक बाबी   


स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन; योगदानाला उजाळा 

पालकमंत्री सरनाईक यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन करून केली. त्यांनी सांगितले, 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा भारतीय संघराज्यात विलीन झाला. निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्धच्या या लढ्यात सर्व समाजघटकांनी, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात हिप्परगा येथे स्थापन झालेल्या राष्ट्रीय शाळेचा उल्लेख केला, जिथे स्वामी रामानंद तीर्थ यांनी प्राचार्य म्हणून काम केले आणि अनेक क्रांतीकारक घडवले. महिला स्वातंत्र्यसैनिकांनीही गुप्त माहिती पोहोचवणे, भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना आश्रय देणे यांसारखी महत्त्वाची कामे केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सुरक्षित स्थळ निर्माण केले होते. यालाच कॅम्प म्हटले जायचे. अशाच प्रकारचे कॅम्प धाराशिवच्या परिसरात जुलै 1947 ते मार्च 1948 या कालावधीत गौडगांव, बार्शी, चिंचोली, वाघोली, आंबेजवळगे, कौडगांव, वाघदरी, पानगांव मुस्ती व इट या भागात सक्रीयपणे कार्यरत होते. या बंदीला झुगारुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. धाराशिव  तालुक्यातील चिलवडीच्या रामभाऊ जाधव या स्वातंत्र्य सैनिकाने  शेकडो  लोकांना एकत्र करुन खेड्यापाड्यात  तिरंग्याची मिरवणूक  काढली. सन 1760 मध्ये मराठवाडा या शब्दाच जन्मही जिल्ह्यातच झाला.  13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो  मोहिमेअंतर्गत  भारतीय लष्कराने चारही बाजुंनी हैद्राबादमध्ये  सैनिक घुसविले. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली, असेही त्यांनी सांगितले. 


 युनेस्कोच्या वारसा यादीत किल्ले ! 

11 जुलै 2025 रोजी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणाऱ्या शिवनेरी,राजगड,प्रतापगड,पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग,विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी या 12  किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.


 जिल्हा विकासासाठी विविध उपक्रम, योजना 

पालकमंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात 100 दिवस कार्यालयीन सुधारणा उपक्रमांचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला.  पुढील 150 दिवसांच्या सुधारणा टप्प्यास गती मिळाली, यासह जिल्ह्यातील विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 'विकसित भारत-2047' आणि 'विकसित महाराष्ट्र-2047' च्या व्हिजननुसार जिल्हा विकासाचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे सांगितले.


 डिजिटल आणि पारदर्शक प्रशासन: 'तुळजाई चॅटबॉट', 'कल्पवृक्ष स्मार्ट-जीआर', 'कार्यसिद्धी पोर्टल', 'सिंगल विंडो सिस्टीम' आणि 'जीवनरेखा पोर्टल' यांसारखे विविध डॅशबोर्ड व डिजिटल पोर्टल्स सुरू करण्यात आले आहेत. यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख झाले आहे.


सेवा पंधरवडा : महसूल विभागामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 'छत्रपती शिवाजी महाराज, महा-राजस्व अभियान' अंतर्गत 'सेवा पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत पाणंद रस्ते मोहीम, सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत 2011 पूर्वीचे रहवािसी  प्रयोजनासाठी असलेले शासकीय शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कार्यवाही केली जाईल. तरी नागरिकांनी या पंधरवड्यात सहभागी होण्याचे आवाहन सरनाईक यांनी केले. 


 नोकरी आणि रोजगार : ग्रामीण व शहरी भागात 540 नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच, अनुकंपा भरती अंतर्गत उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे. भरतीसाठी जिल्हास्तरावर 19 पात्र उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तसेच धाराशिव जिल्हयातील विविध विभागामार्फत गट-ड मधील एकूण 35 अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरु आहे.


 जनता दरबार : नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हास्तरापासून मंडळस्तरापर्यंत सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 01 या वेळेत 'जनता दरबार' आयोजित केला जातो, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.


महत्वाकांक्षी प्रकल्प, यश 

भारताला 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्याच्या प्रवासात भारत सरकारने 2025-26 पर्यंत अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्‌ि‍दष्ट ठेवले आहे. त्याचप्रमाणे राज्यानेही 2047 पर्यंत आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातील महत्त्वाच्या उपक्रमांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या आराखड्यात अनेक नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत, त्यामध्ये 


इनडोअर हॉलचे आधुनिकीकरण: श्री. तुळजाभवानी स्टेडियममधील इनडोअर हॉलसाठी 3.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा मिळतील.


नीती आयोगाच्या कामगिरीत तिसरा क्रमांक: नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात धाराशिव जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विशेषतः कृषी आणि जलसंपदा क्षेत्रात अव्वल स्थान मिळवल्यामुळे जिल्ह्याला सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. संपूर्णतः अभियानांतर्गत जिल्ह्याला कांस्य पदक प्राप्त झाले, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. 


 श्री. तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा: 1865 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भाविकांसाठी सुविधा वाढवेल. हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पर्यटन विभागाने श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला आहे, ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.


 इतर महत्त्वाचे उपक्रम : सोयाबीन पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, शासकीय वैद्यकीय व महाविद्यालयाकडून स्त्री रूग्णालय येथे  प्रशासनाच्या मदतीने रक्त साठवण केंद्र सुविधा उपलब्ध  करून देण्यात आली आहे. तसेच गर्भावस्थेतील रोगनिदान होण्याच्या दृष्टीने 'उम्मीद' केंद्र सुरू करण्यात येत आहे. 'मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र' अभियानांतर्गत 322 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अवयवदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून विशेषत: एका संस्थेने पुढाकार घेऊन एकाच महिन्यात तीन देहदान केले, जे एक प्रशंसनीय व ऐतिहासिक पाऊल आहे.


 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' मोहिमेचा शुभारंभ 

याच कार्यक्रमात 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या महत्त्वाकांक्षी अशा जिल्ह्यातील मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते आज झाला. ही मोहीम केवळ आरोग्य तपासणीपुरती मर्यादित नसून, प्रत्येक कुटुंबाला आणि समाजाला सशक्त बनवण्याचे पाऊल असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. महिला निरोगी राहिल्यास त्या कुटुंबाची अधिक चांगली काळजी घेऊ शकतात,असेही ते म्हणाले.

 
Top