धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 144(3) अन्वये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी साजरा होणार आहे.या दिवशी विविध पक्ष,संघटना व इतर नागरिकांकडून मोर्चे,सभा, धरणे,उपोषणे,आंदोलने,रस्ता रोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
मुख्य ध्वजारोहण समारंभाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले असून,या ठिकाणी पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्याचप्रमाणे शिंगोली सर्किट हाऊस, जिल्हाधिकारी कार्यालय,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर इत्यादी ठिकाणीही जमावबंदी आदेश लागू राहील.
या आदेशानुसार 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपासून ते 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणे,मोर्चा,धरणे, आंदोलन,रस्ता रोको,सभा घेणे प्रतिबंधित राहील. उपविभागीय दंडाधिकारी श्री.ओकार देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी व कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.