धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्राम विकास विभाग मंत्रालय,मुंबई यांनी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमित करत नव्या अधिसूचनेद्वारे पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे जिल्हानिहाय आरक्षण निश्चित केले आहे.ही अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर ती लागू करण्यात आली असून,विविध प्रवर्गांसाठी  अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच खुला प्रवर्ग  यांसाठी सरपंच पदांचे तालुकानिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम 1964 मधील नियम 4 नुसार महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.मात्र,या अधिकारांचे विकेंद्रीकरण करत, जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी विशेष प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  धाराशिव व तुळजापुर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी,धाराशिव; उमरगा व लोहारासाठी उपविभागीय अधिकारी,उमरगा;कळंब व वाशीसाठी उपविभागीय अधिकारी, कळंब; भूम व परंडासाठी उपविभागीय अधिकारी,भूम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महिलांच्या आरक्षणासाठी सोडत प्रक्रिया दिनांक 10 जुलै 2025 रोजी धाराशिव कळम उमरगा आणि भूम या ठिकाणी सकाळी 10:30  वाजता सुरू होणार आहे.तर तुळजापूर लोहारा वाशी आणि परंडा या ठिकाणी दुपारी चार वाजता ही प्रक्रिया पार पडणार आहे.या प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांना संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांशी समन्वय साधून आरक्षण प्रक्रिया वेळेत व सुस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 
Top