धाराशिव (प्रतिनिधी)-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर कर्ज आहे. माझ्यावर ते फार प्रेम करीत होते. मी सुध्दा उध्दव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर संपर्कात राहून चौकशी करीत होतो. ज्यावेळी उध्दव ठाकरे अडचणीत येतील त्यावेळस पहिला व्यक्ती असेन त्यांना मदत करणारा असे मोदी यांनी सांगितले आहे. याविषयी बोलताना उध्दव ठाकरे यांनी माझ्या प्रकृत्तीची चौकशी करीत असताना त्यांचे खालचे लोक माझे सरकार कसे पाडायचे याचे कट कारस्थान करीत होते. त्यामुळे मोदी जर कधी अडचणीत आले तर मी सुध्दा त्यांच्या मदतीला धावून जाणारा पहिला व्यक्ती असेन असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी धाराशिव येथे केले.

शनिवार दि. 4 मे रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर रात्री उस्मानाबादचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची सभा झाली. यावेळी विरोध पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, कॉग्रेसचे विश्वास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील दुधगावकर, मसूद शेख, शिवसेनेच्या शामल पवार, मकरंद राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. 

उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अमित शहा व नरेंद्र मोदी यांनी कोकणात व इतरत्र केलेल्या भाषणासंदर्भात घणाघाती टिका केली. 2014 साली फडणवीस यांनी सांगितले की वरून आदेश आला आहे की युती तोडा. त्यावेळस मोदींना हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कर्ज आठवले नाही का? बाळासाहेब यांच्या खोलीच मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. कर्ज आहे म्हणता तर मला का खोटे ठरवता? असा प्रश्न उपस्थित करून उध्दव ठाकरे यांनी मोदी-शहांना दिलेल्या शब्द आठवत नाही असे म्हणतात. हे गजनी सरकार आहे. याला खाली खेचायचे आहे. महाराष्ट्राबद्दल आकस असल्यामुळेच निवडणूक आयोगाने जय भवानी जय शिवाजी या घोषणेमधील जय भवानी शब्द हाटविण्यास सांगितले आहे. पण ते शब्द आम्ही हटविणार नाही. असे सांगत ठाकरे यांनी औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. ज्या-ज्या वेळस महाराष्ट्रावर संकट येत असते त्या-त्या वेळेस महाराष्ट्रातील जनता जात, पात, धर्म विसरून संकटाला मातीत गाडते. असेही ठाकरे यांनी सांगितले. मोदी यांच्या 400 पार नाऱ्या विषयी बोलताना उध्दव ठाकरे यांनी सामान्य परिवारात जन्मलेल्या व्यक्तींने संविधान लिहिले आहे. त्यामुळे त्यांचा आकस आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनाच्या चळवळी केल्या. हे यांना पाहवत नाही. संविधान बदलण्याची भाषा केल्यास देश पेटून उठेल असा इशाराही उध्दव ठाकरे यांनी दिला.


 
Top