येरमाळा (प्रतिनिधी)- श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सोमवार पहिल्या पौर्णिमेपासूनच पासून प्रारंभ झाला आहे. यात्रेसाठी लाखो रविवार पासुनच भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले आहेत. यात्रेचा मुख्य विधी अर्थात चुना वेचण्याचा कार्यक्रम बुधवारी सकाळी 10 वा. होणार असल्याने भाविकांची संख्या आणखी वाढणार आहे.



आज चैत्र पौर्णिमे निमित्त मंदिरात देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून भाविकांनी दर्शन घेतले. येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमे निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मिळेल त्या वाहनाने भाविक येरमाळा नगरीकडे दाखल होत आहेत.येरमाळ्याच्या शिवारात, रस्त्याकडेला,शेतात झाडाखाली भाविकांनी जागा दिसेल तिथे राहुट्या मारल्या आहेत. झाडाचा आधार घेत अनेकांनी सावल्या शोधल्या असून विशेष दोन दिवसांचा मुक्कामाची तयारी केली आहे. गेल्या आठवडा भपासून उष्णतेची लाट असल्याने आजही उन्हाचा पारा 38 अंशावर असूनही भाविक देवीच्या श्रद्धेपोटी उन्हाची पर्वा न करता देवीच्या भक्तिरसात गुंग झाल्याचे चित्र येडेश्वरी मंदिर परिसरात दिसतं होते. मंदिराच्या चोही बाजुला दिसेल तिथे पर्यंत भाविकांची गर्दी दिसत होती.



चैत्र पोर्णिमा यात्रेला रब्बी हंगामातील गहू,ज्वारी,हरभरा नवीन आलेल्या धान्याचा देवीला पुरणपोळीचा मान आहे. तर आमराईत पालखीला वड्या, भाकरीचा नेवैद्यचा मान आहे. आज पोर्णिचा नेवैद्य करण्यासाठी तीन दगडाची चूल मांडून नेवैद्य केला. तो देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भावकांची धावपळ सुरू होती. 



पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवल्यानंतर  सर्व भाविक आराध्याच्या गीतात रंगून गेले. संबळ, जहाजाच्या, ढोलकीच्या, हलगीच्या, तालावर आराधी गाण्यावर भाविकांना ठेका धराला होता. या आनंद उत्सवाचे चित्र डोळे भरुन पाहण्यासाठी कांही भाविकांनी गर्दी केल्याचे दिसत होते. रात्री 10 वा.देवीची चैत्र पोर्णिमेनिमित्त महापूजा, आरती करुन देवीच्या छबिण्याचा कार्यक्रम झाला. मंदिर परिसरातील सर्व लहान मोठया देवांच्या आरत्या करुन देवीच्या पालखी छबीण्याची परिक्रमा पार पडली. यावेळी ठीक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने यात्रेला छावणीचे स्वरुप आल्याचे दिसतं होते.

 

 
Top