धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी होणारा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ कोणत्याही व्यत्ययाविना पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी धाराशिव शहरातील शिंगोली सर्किट हाऊस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि तेथून पोलिस अधीक्षक कार्यालय या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी हा आदेश जारी केला.

येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे.या दिवशी विविध पक्ष,संघटना आणि नागरिकांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चे,धरणे,उपोषणे,आत्मदहन, रास्ता रोको आदी आंदोलनात्मक कार्यक्रम केले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,धाराशिव येथेही वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मंत्री महोदय शिंगोली सर्किट हाऊस येथून जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या प्रवासमार्गासह संबंधित परिसरात आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शिंगोली सर्किट हाऊस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे आवश्यक असल्याचा अहवाल संदर्भ क्र. १ मधील पत्रान्वये सादर करण्यात आला होता.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २४ वाजल्यापासून १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २४ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहे.

त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.१६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शिंगोली सर्किट हाऊस,धाराशिव–छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,धाराशिव ते पोलिस अधीक्षक कार्यालय, धाराशिव या परिसरात उपोषण, आत्मदहन,धरणे,मोर्चा,रॅली,रस्ता रोको,ध्वनिक्षेपकाचा वापर आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

 
Top