तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशभरातून, विशेषतः कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक खासगी वाहनाने तुळजापूरला येतात. मात्र, या भाविकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात असल्याचे गंभीर आरोप वाहनचालकांकडून होत आहेत. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेलाच धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सध्या उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई आणि यात्रेचा हंगाम असल्याने तुळजापूरकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज हजारो खासगी तसेच मालवाहतूक वाहने विविध महामार्गांवरून तुळजापूरकडे येत असताना तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांना अडविले जात असल्याची चर्चा आहे. विशेषतः तुळजापूर-सोलापूर, तुळजापूर-धाराशिव तसेच तुळजापूर परिसरातील महामार्गांवर हा प्रकार होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. विशेषता तुळजापूर अक्कलकोट रस्त्यावरही आता महामार्ग पोलीस थांबू लागले आहेत. कारण या रस्त्यावर शहरी भागातील भाविकांच्या गाड्या मोठ्या प्रमाणे असतात 

महामार्गावर चोऱ्या दरोडे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे दुर्लक्ष असून वाहनांची तपासणी मात्र कसून पणे केली जात असल्याने यामागे गौड बंगाल काय असा प्रश्न चालक प्रवाशातून केला जात आहे  

काही वाहनचालकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर आरोप केला की, वाहनाची कागदपत्रे व्यवस्थित असतानाही त्यांना रस्त्यात अडवून चौकशी केली जाते. किरकोळ कारणे पुढे करून दंडाची भीती दाखविली जाते आणि त्यानंतर रोख रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे.

“कागदपत्रे व्यवस्थित असतानाही वाहन थांबवून चौकशी केली जाते. कारवाईची भीती दाखविल्यानंतर पैशांची मागणी होते. पैसे दिल्यानंतर वाहन सोडले जाते,” असा आरोप काही वाहनचालकांनी केला.

विशेषतः रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करणारे वाहनचालक आणि परराज्यातील भाविक या प्रकाराला अधिक बळी पडत असल्याची चर्चा आहे. कर्नाटकातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भाषेची तसेच स्थानिक प्रक्रियेची पूर्ण माहिती नसल्याने त्यांची अधिकच गोची होत असल्याचे सांगितले जाते.


निर्जन रस्त्यावर ‌‘चेकिंग', गर्दीच्या ठिकाणी दुर्लक्ष?

महामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही वाहनचालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, वाहनांची वर्दळ कमी असलेल्या निर्जन महामार्गावर मात्र महामार्ग पोलीस मोठ्या प्रमाणात तपासणी करताना दिसतात, अशी तक्रार वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

विशेषतः मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या गर्दीच्या दिवशी टोल नाक्यांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच भाविकांच्या वाहनांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची काळजी घेणे अपेक्षित असताना तपासणीच्या नावाखाली वसुलीचे आरोप होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे परिवहन मंत्री यांच्या शेता समोरच ही वसुली चालू असल्याचे समजते. भरदुपारी तसेच रात्रीच्या वेळी वाहनांना थांबवून तपासणी केली जात असल्याचे वाहनचालक सांगतात. मालवाहतूकदार, व्यापारी आणि लांब पल्ल्याचे चालक या प्रकारामुळे त्रस्त असल्याचे चित्र आहे.


‌‘दक्षिणा' आधी महामार्ग पोलिसांना, नंतर देवीच्या चरणी?

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये या कथित प्रकाराबद्दल नाराजी वाढत आहे. ‌‘देवीच्या दर्शनापूर्वी महामार्ग पोलिसांना दक्षिणा द्यावी लागते', अशी उपरोधिक भावना काही वाहनचालक व्यक्त करीत आहेत. या आरोपांची सत्यता तपासण्याची आवश्यकता असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.


सीसीटीव्ही फुटेज तपासा; चौकशी करा

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे. तपासणीच्या ठिकाणी उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासावे, संबंधित कर्मचाऱ्यांच्या कारवाईची नोंद पडताळावी आणि दंडाची अधिकृत पावती न देता रोख रकमेची मागणी झाली आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी आहे.


महामार्गावरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेवरच अशा प्रकारचे आरोप होत असतील तर ते गंभीर आहे. परराज्यातून श्रद्धेने तुळजापूरला येणाऱ्या भाविकांच्या मनात महाराष्ट्राबद्दल गैरसमज निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने या आरोपांची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आरोपांची सत्यता चौकशीतून स्पष्ट होईल; मात्र वाहनचालकांकडून होत असलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास महामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. 

 
Top