धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाने मोठा खंड दिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी पिके सुकून गेली आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर पीक काढून पुढील पिकासाठी जमीन तयार करण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत पीक काढण्यापूर्वीच पीक कापणी प्रयोग घेण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. पीक नुकसान आणि पिकांच्या स्थितीचा विचार करून पीक कापणी प्रयोग वेळेत घेण्याची मागणी आपण केली होती. त्यानुसार ऑक्टोबर ऐवजी सप्टेंबर महिन्यात पिक कापणी प्रयोग घ्यावे. असे निर्देश कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोगाच्या आधारे संबंधित महसूल मंडळातील पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत झालेली घट विचारात घेऊन नुकसानभरपाई निश्चित केली जाते. त्यामुळे पीक कापणी प्रयोग अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. ‘पीक सुकले म्हणून काढून टाकू' असे न करता, आधी पीक कापणी प्रयोग करून घेणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. पावसाच्या खंडामुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतपूर्व पीक काढावे लागू शकते. अशा शेतकऱ्यांचे नुकसान योग्य पद्धतीने नोंदवले जावे आणि त्यांना विमा योजनेचा दिलासादायक लाभ मिळताना अडचण येऊ नये, यासाठी हा विषय सातत्याने आमदार पाटील यांनी शासन दरबारी मांडला. आता कृषी आयुक्तांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकरी बांधवांनी यंत्रणेशी संपर्क साधून पीक कापणी प्रयोग पूर्ण करून घ्यावा, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
