धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय जूनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे. प्राची अंधारे हिने 5 किमी चालणे या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक, तर संध्या राठोड हिने लांब उडीमध्ये कांस्यपदक पटकावले.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दोन्ही गुणवंत खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा देत त्यांच्या क्रीडा वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे, प्राची अंधारे आणि संध्या राठोड या दोन्ही गुणवंत खेळाडू ‘मिशन लक्षवेध' अंतर्गत प्रतिभा विकास केंद्र, धाराशिव येथे नियमित सराव करत आहेत. या केंद्रामध्ये खेळाडूंना नियमित प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सरावाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या कामगिरीत दिसून येत असून, राज्यस्तरावर पदकांची कमाई करत या खेळाडूंनी धाराशिवच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.
या यशामुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रतिभा विकास केंद्रातून भविष्यात आणखी गुणवंत खेळाडू घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या यशामागे खेळाडूंची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. यावेळी प्रशिक्षक योगेश थोरबोले, अजिंक्य वराळे आणि संतोष राठोड, राजेश भवाळ उपस्थित होते.
