धाराशिव (प्रतिनिधी)-  कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशाशी जोडणाऱ्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाला आता आणखी वेग येणार आहे. या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने राज्याच्या हिश्श्याचे आणखी 240 कोटी रुपये वितरित करण्यास गुरुवारी मंजुरी दिली आहे. या महत्वाच्या निर्णयामुळे प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला असून, डिसेंबर 2029 पर्यंत संपूर्ण रेल्वेमार्ग पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला आणखी गती मिळाली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव या तीन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या 84.28 किलोमीटरच्या रेल्वे प्रकल्पाचा मूळ अंदाजित खर्च 904.92 कोटी रुपये होता. ठाकरे सरकारच्या काळात राज्याच्या हिश्श्याचा वाटा उपलब्ध करून देण्यात न आल्याने प्रकल्प खर्च वाढत गेला. प्रकल्पाच्या खर्चात झालेल्या वाढीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3,295.74 कोटी रुपये सुधारित खर्चास मान्यता दिली असून, त्यानुसार राज्याचा 50 टक्के हिस्सा 1,647.87 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी 340 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. आता आणखी 240 कोटी रुपये मंजूर झाल्याने प्रकल्पाच्या कामाला मोठी चालना मिळणार आहे. दरम्यान, धाराशिव-तुळजापूर या 30.70 किलोमीटरच्या टप्प्याचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यावर तुळजापूर, वडगाव आणि सांजा ही तीन नवीन स्थानके उभारली जात असून, आठ मोठे पूल, नऊ छोटे पूल, 12 रोड अंडरब्रिज, आठ रोड ओव्हरब्रिज आणि 10 मर्यादित उंचीचे सबवे अशी कामे सुरू आहेत. जून 2027 पर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात धाराशिव-तुळजापूरदरम्यान रेल्वेसेवा सुरू होण्याची अपेक्षाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, सोलापूर-तुळजापूर 53.586 किलोमीटरच्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी असून, डिसेंबर 2029 पर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वेमार्गामुळे तुळजापूरच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच सोलापूर-धाराशिव परिसरातील व्यापार, उद्योग, शेतमाल वाहतूक आणि रोजगाराच्या संधींना हातभार लागण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, गुरुवारी मंजूर झालेल्या 240 कोटी रुपयांमुळे कामाला आणखी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.


सोलापूर-तुळजापूर मार्गाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाच नवी स्थानके उभारली जाणार

सोलापूर ते तुळजापूरदरम्यान प्रकल्पाच्या महत्वाच्या टप्प्यात 53.586 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गावर सोलापूर हे विद्यमान स्थानक राहणार असून खेड, मार्डी, तामलवाडी, माळुंब्रा आणि रायखेल अशी पाच नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. या टप्प्यात 1 हजार 340 मीटर लांबीचे अर्थात एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे दोन बोगदे, आठ मोठे पूल, 37 छोटे पूल, 36 रोड अंडरब्रिज, सात रोड ओव्हरब्रिज तसेच 20 मर्यादित उंचीचे सबवे उभारण्यात येणार आहेत. सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर 2029 पर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

 
Top