धाराशिव (प्रतिनिधी)-  छात्र नेत्या नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्यासाठी विविध सनदशीर मार्ग उपलब्ध असताना अशा प्रकारे व्यक्तीवर शाईफेक करणे ही निषेधार्ह बाब असून, अशा घटनांना थारा मिळता कामा नये, अशी भूमिका पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात संतापाची भावना निर्माण झाली असून, राजकीय विरोध हा विचारांच्या आणि लोकशाहीच्या चौकटीतच व्हायला हवा. कोणत्याही व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे किंवा त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला करणे योग्य नाही. राजकीय मतभेद असले तरी ते चर्चेच्या आणि लोकशाही मार्गाने सोडविणे गरजेचे आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेची संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेऊन घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने करण्यात आली.


 
Top