उमरगा (प्रतिनिधी)- कराळी येथील आगजाप्पा देवस्थान परिसरात विविध फळांचे व सावली उपयुक्त 250 रोपांची लागवड करून तुरोरीच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा साजरी केली.
उमरगा तालुक्यातील कराळी येथील आगजाप्पा देवस्थान (अग्निबेट) परिसरात वृक्षारोपण करून तुरोरीच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा साजरी केली. सामाजिक वनीकरण विभागाकडून चिंच, आंबा, वड, पिंपळ, जांभुळ, करंज, बदाम यांसारख्या विविध फळांचे व सावली उपयुक्त 250 रोपांची लागवड करण्यात आली. देवस्थानचे महंत तेजनाथ महाराज यांच्या हस्ते पहिले रोप लाऊन वृक्षारोपण 2025 सुरू करून गुरूपौर्णिमेचा हा सामाजिक व सांस्कृतिक ठेवा जपण्याचा प्रयत्न विद्यालयाने केला. तसेच वृक्षारोपणाचा दुसरा टप्पा 19 जुलै रोजी हाती घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुरेशी रोपं सज्ज ठेवण्यात आली आहेत. यावेळी ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एम अहिरे, पर्यवेक्षक सी. पी. गठडे, ज्येष्ठ शिक्षक जी. बी. दुधभाते, प्रा. प्रतिक्षा मुरमे व कराळी ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनींचे विशेष परिश्रम याकामी लाभले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी टी. पी. पौळ, पी. टी. कोळी, एम. आय. शेख, एस. एस. पुजारी यांनी परिश्रम घेतले.